पीर जंगी साहेब यांच्या दर्ग्यामुळे प्रसिध्द असलेला मंगळवार पेठेतील जंगी वाडा हा केवळ वारसा नव्हे, तर लाखोंचे श्रद्धास्थानही आहे. हिंदू-मुस्लिमांच्या ऐक्याच्या आणि अठरापगड जातींच्या श्रध्देचा धूप जेथे दरळतो, असे हे पवित्र स्थान. जंगी या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे मोठा, विशाल आणि दुसरा अर्थ म्हणजे जंग वर म्हणजे युध्दावर जाणरा, म्हणून जंगी. इमाम हुसैन-शहनशाह-ए-करबाला यांच्या स्मरणार्थ या वाड्यात मोहरमच्या महिन्यात ताबुताची स्थापना करण्यात येते. ऐंशी फूट लांब आणि पंचवीस फूट रुंद अशा या वाड्याला अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वींचा इतिहास आहे. पिराच्या पंजावरील तलवारीही खूप जुन्या आहेत. भक्कम दगडी जंगी वाड्यात शिसव आणि सागवानात केलेले कोरीवकाम, विशेषतः जाळीदार दरवाजा बघण्याजोगा आहे.